पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
कुदळवाडी परिसरात शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याची अवैध विक्री करणाऱ्या एका विक्रेत्याला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत ३६ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विसावा चौकाजवळील रॉयल फोम वॉशिंग अँड ग्रीसिंग सेंटर परिसरात दिलीप ऊर्फ ओमप्रकाश राजाराम मोदनवाल (वय २६) हा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत आरोपीकडून विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैध विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 227453