पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
मोशी परिसरात गावठी हातभट्टी दारूची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकावर गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने कारवाई केली. या कारवाईत ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेबर कॅम्प, कुदळेवस्ती, मोशी येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान एका विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेली ३० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे ३ हजार रुपये असून संबंधित बालक हा दारू विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगून असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून अवैध दारू व्यवसायामागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.



