पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
कौटुंबिक वादाचे पर्यवसान मारहाणीत होत रिक्षाचालकावर धातूच्या फायटरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रामनगर, चिंचवड परिसरात घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी मेव्हण्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन देवकाते (वय ३८) यांनी आपल्या सासू आणि शेजारील महिलेतील सुरू असलेले भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्नीला तिच्या आईला घेऊन माहेरी जाण्याचा सल्ला दिला. याचा राग आल्याने पत्नी, सासू आणि मेव्हण्याने त्यांच्याशी वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर मेव्हणा संदीप महानवर याने हातात धातूचे फायटर घालून सचिन देवकाते यांच्या तोंडावर व डोक्यात वार करून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. यावेळी तिघांनी शिवीगाळ व धमक्याही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संदीप महानवर, संगिता महानवर आणि रेश्मा देवकाते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.




Total Users : 227589