११ महिन्यांत ९४ जणांवर कारवाई; स्थानिक रॅकेटच्या तपासाला वेग
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पुणे पोलिसांनी शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत आणखी एक मोठी कारवाई केली आहे. झोन वन अंतर्गत बुधवार पेठ परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये पाच बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर वास्तव्य आणि त्यामागील स्थानिक नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात दहा दिवसांपूर्वीही पुणे पोलिसांनी मोठी मोहीम राबवत १८ बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा पाच जण सापडल्याने शहरात अशा नागरिकांचे जाळे अधिक व्यापक असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
झोन वनचे डीसीपी कृषिकेश रावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०२५ पासून आतापर्यंतच्या अवघ्या ११ महिन्यांत पुणे पोलिसांनी तब्बल ९४ बांग्लादेशी नागरिकांना पकडले आहे. यापैकी ६० हून अधिक जणांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या देशात डिपोर्ट करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून, पुण्यासह मुंबई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये बांग्लादेशी नागरिकांना स्थायिक होण्यासाठी स्थानिक एजंट आणि रॅकेट मदत करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बनावट कागदपत्रे, भाड्याने घरे मिळवून देणे, रोजगार उपलब्ध करून देणे यासारख्या माध्यमांतून हे नेटवर्क कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.
या संपूर्ण रॅकेटचा तपास सध्या पुणे पोलीस अधिक सखोलपणे करत असून, संबंधित दलाल आणि स्थानिक संपर्कांची माहिती गोळा केली जात आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पुढील काही दिवसांत आणखी कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येणार असल्याचेही पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना परिसरात संशयास्पद हालचाली, बनावट कागदपत्रांचा वापर किंवा ओळख लपवून राहणाऱ्या व्यक्तींबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.


