spot_img
spot_img
spot_img

अष्टविनायकातील तीन प्रमुख गणेश मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद

जतन, संवर्धन आणि दुरुस्ती कामांसाठी निर्णय; १० मे ते ९ जूनदरम्यान दर्शन बंद राहणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने अष्टविनायक भक्तांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक मंदिरांच्या जतन, देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल ट्रस्टच्या वतीने राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.

सध्या श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर येथे जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मुख्य मंदिर, गाभारा आणि सभामंडपाचे पौराणिक स्वरूप जपत मूळ दगडी बांधकामाच्या पद्धतीने संवर्धन करण्यात येत आहे. ही कामे अधिक वेगाने आणि सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावीत यासाठी भाविकांचा सततचा वावर अडथळा ठरू शकतो, अशी भूमिका पुरातत्त्व विभागाने मांडली होती.

याच पार्श्वभूमीवर पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे तीनही मंदिरे एकाच वेळी तात्पुरती बंद ठेवण्याची विनंती केली होती. मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सह धर्मादाय आयुक्तांनी दि. ७ मे २०२६ रोजी आदेश जारी करत १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही संबंधित मंदिरांमध्ये दर्शन बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच ८ मे रोजी ग्रामस्थांसोबत ग्रामसभा घेऊन मंदिर बंद ठेवण्याच्या आदेशाची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या सूचना

  • मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरी नित्य पूजाअर्चा आणि धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहतील.
  • या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
  • पुजारी, अधिकृत अधिकारी, कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश मिळणार नाही.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी भाविकांना आवाहन करताना सांगितले की, “मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील विकासकामे ही मंदिरांच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!