शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘वाचनातून जीवन समृद्ध होते!’ असे मत लेखिका प्रा. रूपाली अवचरे यांनी थेरगाव येथे व्यक्त केले. संवाद व्यासपीठ आयोजित लेखक – वाचक संवाद कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. याच कार्यक्रमात निमंत्रितांचे कविसंमेलन आणि कार्यकर्तृत्व पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी सुरेश कंक, चंद्रकांत धस, भाजप शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, नगरसेविका शालिनी गुजर, वाचक संवाद समितीचे अध्यक्ष अविनाश रानवडे, कांचन दीक्षित, जगन्नाथ फडतरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. रूपाली अवचरे पुढे म्हणाल्या की, ‘आयुष्यातील यश अपयश यावर मात करण्याचे बळ पुस्तके देतात. त्यामुळे माणूस संस्कारक्षम होतो!’ याप्रसंगी सोळा कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. युवा अभिनेत्री श्रुती उबाळे, नाना शिवले, तृप्ती निंबळे, गोविंद चौधरी, राजेंद्र शिंदे यांना कार्यकर्तृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद व्यासपीठाचे अध्यक्ष हरीश मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुहास घुमरे यांनी तर आभार लीना कोंडे यांनी मानले.




