शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली असून विविध विभागांनी विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आज झालेल्या स्थायी समिती सभेत विभागप्रमुखांचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या वाढीव उत्पन्नामुळे महापालिकेच्या आर्थिक स्थितीत मोठी बळकटी आली असून शहराच्या विकासाचे चक्र अधिक वेगाने धावणार आहे, असा विश्वास सभापती अभिषेक बारणे यांनी यावेळी व्यक्त केला.
या सन्मान सोहळ्याप्रसंगी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, विकास साने, सुलभा उबाळे यांसह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाने यंदा सर्वाधिक ९६१ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यापाठोपाठ बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ६७६ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाने ८० कोटी ७४ लाख रुपये, आकाशचिन्ह व परवाना विभागाने २१ कोटी ५० लाख रुपये आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने १ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. या प्रभावी कामगिरीबद्दल सभापतींनी सहशहर अभियंता सुनील बागवानी, उप आयुक्त सचिन पवार, राजेश आगळे, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, पंकज पाटील, व्यंकटेश दुर्वास आणि मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे यांचे विशेष अभिनंदन केले व महसूल वाढीची ही कामगिरी कायम राखण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आजच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील विविध विकासकामांना आणि विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये प्रभाग क्र. ८ मधील एमआयडीसी एस ब्लॉक, सेक्टर क्रमांक ९, ११, १२, १३ व इतर ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ८ मधील सेक्टर १ ते ४ मधील किरकोळ देखभाल दुरुस्तीची स्थापत्य विषयक कामे करणे, प्रजिमा ३१ रस्त्यावरील आवश्यक रोड फर्निचरची व इतर स्थापत्य कामे करणे, तसेच महापालिकेची रुग्णालये आणि दवाखान्यांसाठी लागणारी आवश्यक औषधे व साहित्य खरेदी करणे अशा महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. हे वाढीव उत्पन्न शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल. आज मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना याचा मोठा लाभ मिळेल.
-अभिषेक बारणे,
सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिका.



