spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना स्थायी समितीची गती; आरोग्य, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांना मंजुरी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील विविध विकासकामांशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयातील विद्युत देखभाल व दुरुस्ती कामांसाठी खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शाळा, इमारती व कार्यालयांमधील हमी कालावधी संपलेले नादुरुस्त इन्व्हर्टर व बॅटरी बदलणे, आवश्यकतेनुसार नवीन इन्व्हर्टर बसविणे व संबंधित कामांसाठी खर्चास मंजुरी देण्यात आली.

भोसरी (मौजे कासारवाडी) येथील स. नं. ४९८ मधील मंजूर विकास योजनेनुसार प्रस्तावित १२ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासही मान्यता देण्यात आली. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील १६०० किलोवॅट क्षमतेच्या रोहित्र संच व ब्रेकर्सच्या देखभाल-दुरुस्ती तसेच संबंधित कामांसाठीही खर्च मंजूर करण्यात आला. तसेच सेक्टर १० येथे पर्यायी ट्रान्सफॉर्मर व आरएमयू युनिट बसविण्यास मंजुरी देण्यात आली.

याशिवाय, विविध पंपिंग हाऊस येथे सॉफ्ट स्टार्टर बसविणे, झोपडपट्टीधारकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी चिंचवड (सर्व्हे नं. २९/२) येथील सुमारे ३० हजार चौ. फुट जागा संक्रमण शिबिरासाठी ३ वर्षे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ६ मधील पाणीपुरवठा ट्रेंचेसचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे तसेच पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती करणे यांसारख्या कामांना मंजुरी देण्यात आली.

थेरगाव गावठाण पंप हाऊस येथील पंपाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक विद्युत कामे, तसेच पुणे महानगर परिवहन मंडळाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील संचलन तुटीच्या लेखापरीक्षण अहवालाच्या अवलोकनासाठी खर्चासही मान्यता देण्यात आली.

वैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १९ टाटा सुमो अथवा तत्सम वाहने २ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ८ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉग शेड परिसरातील किरकोळ स्थापत्य दुरुस्ती, विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था, प्रभाग क्र. ९ व २ मधील स्वच्छतागृह दुरुस्ती, तसेच मासुळकर कॉलनी, यशवंतनगर आदी भागांतील दुरुस्ती कामांसाठीही खर्चास मान्यता देण्यात आली.

निगडी सेक्टर २३ येथील उद्यानातील स्थापत्य कामे, कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रासाठी सीमाभिंत बांधकाम, तसेच सांगवी-किवळे रस्त्यावरील बस थांब्यांची देखभाल व दुरुस्ती यांसारख्या कामांनाही स्थायी समितीने मंजुरी दिली.

“पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आजच्या स्थायी समिती बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रामुख्याने आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक सुधारणा आणि प्रलंबित रस्ते विकासाच्या कामांवर आम्ही भर दिला आहे. जिजामाता रुग्णालयातील विद्युत कामे असोत किंवा रावेत उपसा केंद्राची दुरुस्ती, नागरिकांना अखंडित सेवा मिळावी हाच आमचा उद्देश आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी संक्रमण शिबिराची उपलब्धता आणि महापालिका शाळांमधील सुविधांच्या दुरुस्तीमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. शहराच्या हिताचे हे सर्व प्रकल्प कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.”

— अभिषेक बारणे (सभापती, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!