शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील संत तुकाराम नगर येथे उभारण्यात आलेले नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर पूर्णत्वास आले असतानाही अद्याप सुरू न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत तातडीने कामकाज सुरू करून लोकार्पण करण्याची मागणी केली आहे.
या आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी दरवाजे बसवले गेले नाहीत आणि परिसराला कंपाउंड नसल्यामुळे सदर वास्तूचा सर्रास गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे जुगार खेळला जात असून व्यसनाधीन व्यक्तींचे अड्डे तयार झाले आहेत. काहीजण शेकोट्या पेटवत असल्याने परिसर असुरक्षित बनला आहे.
प्रियांका बारसे यांनी याबाबत वैद्यकीय अधिकारी गोफणे साहेब यांना निवेदन देत परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. तसेच लक्ष्मण गोफणे यांची भेट घेऊन त्यांनी थेट तक्रार मांडली. यावर गोफणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
निवेदनात बारसे यांनी नमूद केले आहे की, संबंधित ठेकेदाराला सूचना देऊनही गेल्या पंधरा दिवसांपासून परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे आरोग्य केंद्र साधारण महिनाभरात पूर्ण होऊन सुरू होते; मात्र येथे तीन ते चार महिने उलटूनही कामकाज सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“आरोग्यासारखे पवित्र काम लांबणीवर का?”
या प्रश्नासह बारसे यांनी प्रशासनाला जाब विचारत, तातडीने आरोग्य मंदिर सुरू करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Total Users : 240136