शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने राबविलेल्या अभय योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत असतानाही तिची मुदत वाढविण्याची मागणी पुढे आली आहे. नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अभय योजना राबवण्यात आली असून, या योजनेअंतर्गत मालमत्ता करावरील दंडात तब्बल ९० टक्के सवलत देण्यात आली आहे. कर वसुलीला चालना देणे आणि थकीत धारकांना मोठा दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. या योजनेमुळे महसूल विभागाला चांगली गती मिळाल्याचेही दिसून आले आहे.
मात्र, योजनेचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने आणि नागरिकांपर्यंत तिचा प्रभावी प्रचार उशिरा पोहोचल्यामुळे अनेक मालमत्ताधारक या सवलतीपासून वंचित राहिल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे. त्यामुळे किमान आणखी एक महिना मुदतवाढ देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
गायकवाड यांनी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले असून, मुदतवाढ दिल्यास कर संकलनात लक्षणीय वाढ होईल आणि महानगरपालिकेच्या महसूलातही सकारात्मक भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




Total Users : 240136