शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठांचा अनुभव, त्यांची जिद्द आणि समाजाशी असलेली नाळ ही आपल्या शहराची मौल्यवान ताकद आहे; तर लहान मुलांचा उत्साह, गुणवत्ता आणि नवे विक्रम घडविण्याची क्षमता हे शहराच्या उज्ज्वल भविष्याचे आश्वासन आहे. एका बाजूला आयुष्यभर शिस्त, सातत्य आणि चिकाटी जपणारे ज्येष्ठ, तर दुसऱ्या बाजूला क्रीडा, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार करणारी आपली मुले, हा पिंपरी चिंचवडचा सर्वात प्रेरणादायी चेहरा आहे. अशा व्यक्तींचा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून, संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा आणि नव्या पिढीला दिशा देणारा संदेश आहे. आपल्या शहरातील प्रत्येक गुणवंताला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या पुणे सायकल ग्रँड टूर स्पर्धेच्या निमित्ताने चर्चेत असलेले भोसरी येथील ८४ वर्षाचे प्रसिद्ध सायकलपटू अशोक विष्णुपंत बेलापूरकर तसेच लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारा मनपा शाळेतील विद्यार्थी राम मुगदुस, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदविणाऱ्या ५ वर्षीय तेजस जोशी यांचा सन्मान महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते महापालिकेच्या दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडला,त्यावेळी ते बोलत होते.
या सत्कार सोहळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांच्यासह उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर यांनी ३५ वर्षापूर्वी बेलापूरकर यांची सायकलची आवड पाहून त्यांना सायकल भेट दिली होती. तीच सायकल ते आत्तापर्यंत वापरत होते सायकलवरून गेल्या ७० वर्षात लाखो किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला आहे. वारकरी असलेल्या बेलापूरकर यांनी सायकलवरून आळंदी ते पंढरपूर अशी अनेक वर्ष वारी केली आहे तसेच विविध राज्यांचा प्रवास देखील त्यांनी सायकलवर केला आहे, याशिवाय ते “सायकल चालवा -पर्यावरण वाचवा” आणि “झाडे लावा – झाडे जगवा” अशा सामाजिक कार्याचाही प्रचार करतात अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.
महापौर रवि लांडगे यांनी दिलेली सायकल यापुढील आयुष्यात वापरणार आहे, अशा भावना बेलापूरकर यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केल्या.
विविध क्षेत्रातील खेळाडूंचेही सत्कार….
लॉन टेनिस राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत येथील माध्यमिक विद्यालय केशवनगर शाळेचा इ. १० वीचा विद्यार्थी राम विक्रम मुगदुस याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील लॉन टेनिस च्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देखील तो सहभागी होणार आहे.
तर पिंपरी चिंचवड शहरातील रावेत येथील अवघ्या ५ वर्ष २ महिन्याचा तेजस जोशी याने इंडीया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २ मिनिटे ४ सेकंदात १९५ देशांचे झेंडे ओळखण्याचा विक्रम नोंदवून शहराच्या नावलौकिकात भर पाडली आहे यासाठी त्यांचे आई वडील रेखा व नीलम जोशी यांनी त्याला मार्गदर्शन केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते भरत खंडू आडसूळ यांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.त्यांनी दुर्घटनाग्रस्त आणि कोरोना काळातील मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सामाजिक बांधिलकीतून आर्थिक मदत केली आहे.
या सर्वांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला



