spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी : नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांचा ठोस पाठपुरावा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, वाढती नागरी वसाहत आणि त्यानुसार वाढणाऱ्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेता, या भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी श्री.विनोय चौबे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

सध्या पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना कोणत्याही पोलीस संबंधित कामासाठी सांगवी पोलीस स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. दोन्ही ठिकाणांमधील अंतर, वाढती वाहतूक कोंडी, तसेच मोठ्या प्रमाणात वाढलेली लोकसंख्या यामुळे नागरिकांना तक्रार नोंदविणे, कागदपत्रांची पूर्तता करणे किंवा इतर सेवांसाठी मोठा वेळ व श्रम खर्च करावा लागत आहे. विशेषतः महिलां, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलीस सेवा मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या निवेदनात डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, “पिंपळे सौदागर हा वेगाने विकसित होणारा परिसर असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना लांब अंतर पार करून सांगवी पोलीस स्टेशनला जावे लागणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा पाठपुरावा सुरू आहे.”

या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर परिसरात स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करणे ही अत्यंत गरजेची बाब असल्याचे भिसे यांनी स्पष्ट केले. यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीची योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच तात्काळ व सुलभ पोलीस सेवा मिळू शकेल आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखता येईल.

या महत्त्वाच्या विषयावर भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्री.शत्रुघ्न बापू काटे तसेच सहयोगी नगरसेविका सौ अनिता संदीप काटे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत पोलीस आयुक्त विनय चौबे यांनी सकारात्मक भूमिका दर्शवून या मागणीची गांभीर्याने दखल घेतली असून, लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या उपक्रमामुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!