शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्प २०२६–२७ अंदाजपत्रक सभेच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शेखर चिंचवडे यांनी शहराच्या पायाभूत सुविधांसह नागरिकांच्या दैनंदिन गरजांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या काही महत्त्वाच्या सूचना प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
चिचवडे यांनी केंद्र व राज्य सरकारकडून महानगरपालिकेसाठी विशेष योजनांद्वारे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि वाढत्या नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेता आर्थिक बळकटी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अभय योजनेची मुदत किमान तीन महिन्यांनी वाढवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांना थकीत कर भरण्याची संधी मिळेल आणि महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.
शहरातील वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता पवना बंद पाइपलाइन योजनेसाठी राज्य सरकारची तात्काळ मंजुरी मिळवून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली. ही योजना पूर्ण झाल्यास भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प (सोलर युनिट्स) उभारण्याची मागणीही करण्यात आली. यामुळे वीज बिलाचा खर्च कमी होण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागेल.
याशिवाय प्रभाग क्र. १७ मधील नव्याने समाविष्ट झालेल्या निवासी क्षेत्रांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे. या भागात रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
एकूणच, आगामी अर्थसंकल्पातून शहराच्या विकासाला गती देणारे निर्णय व्हावेत आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, ही अपेक्षा या मागण्यांमधून व्यक्त करण्यात आली आहे.



