पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरीतील वल्लभनगर परिसरात रिक्षा भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाने प्रवाशांवर लाकडी फळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११:४० वाजण्याच्या सुमारास साईबाबा मंदिरामागे, वल्लभनगर येथे ही घटना घडली. फिर्यादी सुभाष छबुलाल अमृतकर (वय ६९) हे आपल्या मुलगा मयुर व सून निकिता यांच्यासह ओला अॅपद्वारे रिक्षा (क्र. MH 14 LS 0457) बुक करून घरी आले होते.
घरासमोर पोहोचल्यानंतर रिक्षाचालकाने ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त पैसे मागितले. यावरून वाद निर्माण झाला. संतापलेल्या चालकाने रिक्षातील लाकडी फळी काढून मयुर यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. वडील सुभाष अमृतकर हे मध्ये पडून थांबवण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने त्यांच्या छातीवर फळीने मारहाण केली.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या नाकावर व छातीवर बुक्क्यांनी मारहाण करून त्यांना ढकलले, ज्यामुळे ते जमिनीवर पडले. दरम्यान, सून निकिता हिलाही ढकलून आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२ तसेच भादवि कलम ३२४, ३२३, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास परिपोउपनि कांबळे करत असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.



