पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
सांगवी परिसरात टोल-फ्री नंबरच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एका नागरिकाची तब्बल १८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २ जानेवारी २०२५ ते ३ जानेवारी २०२५ दरम्यान घडली. फिर्यादी आपल्या घरी असताना त्यांचे एटीएम कार्ड कार्यरत नसल्याने त्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधला. बँकेकडून मिळालेल्या टोल-फ्री क्रमांकाऐवजी चुकून फिर्यादीने भामट्यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला.
सायबर आरोपींनी स्वतःला बँक प्रतिनिधी असल्याचे भासवत फिर्यादीला दुसरा संपर्क क्रमांक दिला. त्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे ओटीपी मागवून “तुमचे एटीएम कार्ड घरपोच येईल,” असे सांगत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या माध्यमातून आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने तब्बल १८,४५,००० रुपये काढून घेतले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. नं. १३३/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१८ (४), ३१६ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) तसेच भादवि कलम ४२०, ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास वपोनि कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवर बँकिंग माहिती, ओटीपी किंवा वैयक्तिक तपशील देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



