पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने फर्स्ट कॉपी शूज विकणाऱ्या दुकानावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत सुमारे ८ लाख ३० हजार २५० रुपयांचे ‘पुमा’ कंपनीचे बनावट शूज, चप्पल व फ्लिप-फ्लॉप जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखा क्रमांक दोनच्या पथकाने काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील लकी बेकरी परिसरातील ‘विकी फुटवेअर’ दुकान व गोडाऊनवर छापा टाकला.
येथे ब्रँडेड नावाखाली बनावट मालाची विक्री सुरू असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी दुकान मालक विकास उर्फ विनोदकुमार रमनानी याच्याविरुद्ध कॉपीराईट अॅक्ट व भारतीय न्याय संहितेनुसार काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘पुमा’ कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी नीरज कुमार नरेंद्रसिंग दहिया यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, या दुकानात इतर नामांकित कंपन्यांचेही बनावट शूज व चप्पल मोठ्या प्रमाणात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.



