spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या ‘एचपीव्ही लसीकरण मोहिमेला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महापालिकेतर्फे आतापर्यंत एकूण ११९ मुलींचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. ही मोहीम केवळ आजारापासून बचाव करण्यापुरती मर्यादित नसून, महिलांच्या दीर्घकालीन आरोग्य सुरक्षिततेसाठी आणि समाजातील कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

एचपीव्ही लसीकरणासाठी पात्रता

भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १४ वर्षांच्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे पण १५ वर्षे पूर्ण झालेली नाहीत) या एचपीव्ही लसीसाठी पात्र आहेत. तथापि, काही परिस्थितींमध्ये एचपीव्ही लसीकरण दिले जाणार नाही किंवा पुढे ढकलले जाईल. यामध्ये १४ वर्षांच्या लक्ष्य वयोगटाबाहेरील मुली, गर्भधारणा असलेली व्यक्ती, पूर्वी एचपीव्ही लस (गार्डासिल किंवा सर्वाव्हॅक) घेतलेली असल्यास, लस किंवा तिच्या घटकांमुळे (यीस्ट) तीव्र ऍलर्जीचा इतिहास असलेली व्यक्ती तसेच मध्यम ते गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच लसीकरण करणे आवश्यक आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत एचपीव्ही लस दिली जात आहे. तसेच सर्व लाभार्थ्यांची नोंद यू-विन (U-WIN) पोर्टलवर करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या १४ वर्षे वयोगटातील मुलींना नजिकच्या महानगरपालिका रुग्णालयात नेऊन मोफत एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि कर्करोगमुक्त भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले.

“एचपीव्ही लसीकरण मोहिमेसाठी सर्व मनपा रुग्णालये व दवाखाने पूर्णतः सुसज्ज असून, आवश्यक मनुष्यबळ, सुविधा आणि औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करत आहेत. या मोहिमेद्वारे १४ वर्षांच्या मुलींना मोफत आणि सुरक्षित लस उपलब्ध करून देत भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घ्यावे.”

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!