spot_img
spot_img
spot_img

‘गुढीपाडवा – पट वाढवा’ हे शासन अभियान प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण पोहोचविण्याचा एक अनोखा प्रयत्न – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘गुढीपाडवा – पट वाढवा’ हे मअभियान केवळ प्रवेश वाढविण्यापुरता मर्यादित नसून, प्रत्येक मुलापर्यंत दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण पोहोचविण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. महापालिका शाळांमधील आधुनिक सुविधा, समर्पित शिक्षकवर्ग आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांच्या बळावर शिक्षणाची भक्कम पायाभरणी होत आहे,त्यामुळे अधिकाधिक पालकांनी या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा महापालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, तसेच या शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.

राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चऱ्होली येथील म्हेत्रेवाडी शाळा क्र. ९३ येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने “गुढीपाडवा पट वाढवा” या विशेष प्रवेश अभियानाचा शुभारंभ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नव्याने शाळेत शाळेत प्रवेश घेऊन आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

याप्रसंगी शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, नगरसदस्य यश साने, नगरसदस्या रिटा सानप, प्रियंका कुदळे, माजी नगरसदस्य सचिन सानप, शिक्षण विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शाळेतील शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतील नवचैतन्य, नव्या सुरुवातीचा सण आहे. याच शुभमुहूर्तावर ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करताना मला विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणारा आहे.कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असताना अशाच स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात येत असे. त्या छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी निर्माण झाली आणि पालकांचा विश्वासही वाढला. आज हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात राबविला जात असल्याचा मला आनंद आहे.अनेकदा महापालिका शाळांबाबत पालकांध्ये गैरसमज आढळून येतात. मात्र, प्रत्यक्षात या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात. या सकारात्मक बाबींची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे ही महापालिका शाळांची विशेषता आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यावर अधिक भर दिल्यास निश्चितच पटसंख्या वाढण्यास मदत होईल. माझ्या स्वतःच्या शालेय जीवनात मला ६ ते ८ रुपयांची शिष्यवृत्ती मिळायची. त्या छोट्याशा रकमेनेही शिक्षणाबद्दलची प्रेरणा वाढत असे. त्यामुळे अशा योजनांचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो, यावर माझा ठाम विश्वास आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी अत्यंत कुशल, समर्पित आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत. विशेषतः म्हेत्रेवाडी येथील शाळेतील महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून, त्यांचे योगदान शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम बनवते. माझी आई देखील मुख्याध्यापिका होती, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील जबाबदाऱ्या आणि मूल्यांची मला जाणीव आहे, महापालिका शाळांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयातून ‘गुढीपाडवा पट वाढवा’ हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले.

शिक्षण समितीच्या सभापती रविना अंगोळकर म्हणाल्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेत महापौर रवि लांडगे आणि नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या सहकार्याने निश्चितच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आहे. आज महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीस तोड अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक साधनसामग्री आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे पालकांचा महापालिका शाळांवरील विश्वास अधिक दृढ होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना महापालिका शाळांकडे आकर्षित करण्यावर भर दिला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी योगाच्या माध्यमातून सादर केलेली गणेश वंदना विशेष आकर्षण ठरली. सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगनृत्याने उपस्थितांची मनं जिंकली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मास्टर ट्रेनर आनंदी जंगम यांनी, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी मानले.

कार्यक्रमानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी संपुर्ण शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली. म्हेत्रे वाडी शाळा क्र. ९३ ही बालवाडी ते आठवीपर्यंत शिक्षण देणारी महापालिकेची दर्जेदार शाळा असून सध्या येथे एकूण ८७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका शाळा केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरत्या मर्यादित नसून, विविध उपक्रम आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. काही विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष कौशल्य आढळून येते. अशा विद्यार्थ्यांना लहान वयापासून योग्य प्रशिक्षण, पोषण आणि मार्गदर्शन दिल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवू शकतात.

महापौर-रवि लांडगे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!