शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तानाजी बारणे यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आल्याने शहरातील शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे यांनी संबंधित बोर्ड तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
संभाजी बारणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेला हा बोर्ड थेट शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यासमोर लावण्यात आला आहे. त्यामुळे पुतळ्याचे दर्शन अडथळित होत असून महाराजांची प्रतिमा झाकली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करून सत्तेत येणारेच त्यांच्या प्रतिमेचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिकेने संबंधित बोर्ड हटवावा, अशी मागणी करत त्यांनी महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा शिवप्रेमी नागरिक स्वतः हा बोर्ड हटवतील, असा इशाराही संभाजी बारणे यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरात आधीच विविध प्रश्नांवरून वातावरण तापलेले असताना या नव्या वादामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. थेरगाव परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाजी महाराजांविषयी असलेल्या जनभावनांचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Total Users : 240372