शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या क क्षेत्रीय कार्यालयात शहराचे प्रथम नागरिक महापौर रवीभाऊ लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रभागातील विविध नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत क प्रभाग अंतर्गत येणाऱ्या परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व्यवस्था, रस्ते, पायाभूत सुविधा, उद्याने तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याबरोबरच प्रलंबित विकासकामांना गती देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी सूचना दिल्या.
यावेळी युवा नेते विशालभाऊ आहेर यांनी प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. प्रभागातील विकासकामांना गती मिळावी यासाठी ते प्रशासनासोबत सातत्याने समन्वय साधत पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत महापौरांना प्रभागातील विकासकामांसंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यामध्ये रामायण मैदान येथील सुमारे ५ हेक्टर जागेत १ एकर जागेत भाजी मंडई, १ एकर जागेत सुसज्ज पार्किंग तसेच उर्वरित जागेत मुलांसाठी खेळाचे मैदान विकसित करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच सेक्टर १६ समोरील कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने ते केंद्र बंद करून कचरा डेपो मोशी येथे हलवण्याची मागणी करण्यात आली. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्याबरोबरच पाण्याच्या टाक्यांना संरक्षण भिंत बांधून सुरक्षा रक्षक नेमावेत आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय प्रभागात उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र विकसित होऊनही बंद असल्याने ते तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या बैठकीस क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, विद्यमान नगरसेवक तसेच पालिकेच्या विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.




Total Users : 240396