महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून योगेश सागर यांनी आमदार लांडगे यांच्या मागणी प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत विविध योजनांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.
AMRUT-३ योजनेअंतर्गत शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पासाठी सुमारे २०१६ कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच पवना थेट जलवाहिनी प्रकल्पासाठी १०१५ कोटी रुपये, आंद्रा प्रकल्पातून १०० एमएलडी पाणीपुरवठा योजनेसाठी २११ कोटी रुपये, तसेच २०० एमएलडी क्षमतेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी ६० कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव आहे. भामा आसखेड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी स्काडा (SCADA) वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्पासाठी ४६ कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन चासकमान व मुळशी धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याचीही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी डुडूळगाव येथे इको टुरिझम पार्कसाठी २०० कोटी रुपये, आंतरराष्ट्रीय दर्जाचा सफारी पार्क, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुलाबपुष्प उद्यान उभारण्यासाठी १०० कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नगरविकास विभागांतर्गत नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादन निधी उपलब्ध करून देण्याची तसेच संविधान भवन उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पर्यावरण, नदी संवर्धनावर ‘‘फोकस’’
पर्यावरण विभागांतर्गत सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पासाठी एकूण १८९८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी ९६० कोटी रुपये आणि पवना नदी सुधार प्रकल्पासाठी ९५३ कोटी रुपये निधीची मागणी आहे. शहरातील जुन्या १४ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे (STP) अपग्रेडेशन करण्यासाठी २५१ कोटी रुपये तसेच गार्डन विभागांतर्गत री-युज ऑफ वॉटर प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोशी घनकचरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया व पुनर्वापर प्रकल्पासाठी ६६३ कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
श्रीक्षेक्ष आळंदीचा यात्राकर अनुदान वाढ करा…
दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यभूमी असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीच्या शाश्वत विकासासाठीही आमदार लांडगे यांनी विविध मागण्या केल्या आहेत. आळंदी नगर परिषदेसाठी आधुनिक प्रशासकीय इमारतीसाठी २५ ते ३० कोटी रुपये, शहरातील पाणी शुद्धीकरण व ड्रेनेज प्रकल्पासाठी सुमारे ३५० कोटी रुपये, तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ३५० कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरातील पाणी वापर व्यवस्थापन सुधारण्यासाठी सर्व नळजोडण्यांवर वॉटर मीटर बसविण्यासाठी ६ कोटी रुपये निधी देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तीर्थक्षेत्रातील सुरक्षा वाढविण्यासाठी CCTV प्रकल्पासाठी ५ कोटी रुपये आणि LED स्ट्रीट लाईट व भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पासाठी १० कोटी रुपये निधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय आळंदी नगरपरिषदेला मिळणाऱ्या यात्राकर अनुदानात वाढ करून आर्थिक ताण कमी करावा, अशीही मागणी आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि श्रीक्षेत्र आळंदीचे वाढते धार्मिक महत्त्व लक्षात घेता पाणीपुरवठा, पर्यावरण, पर्यटन आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. शहराच्या तसेच तीर्थक्षेत्राच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हे सर्व प्रकल्प शासनाकडे मांडले असून त्यासाठी आवश्यक निधी मंजूर व्हावा, यासाठी मी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा करत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असा मला विश्वास आहे.
– महेश लांडगे, अमादार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.



