spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये चार दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रविभाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांचा महाराष्ट्र वारकरी महामंडळ, पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या वतीने आज विशेष सन्मान करण्यात आला. शहरातील वारकरी परंपरेचा सन्मान राखत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या प्रसंगी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात चार दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर उपस्थित सर्व मान्यवरांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वारकरी परंपरा, सांस्कृतिक जपणूक आणि समाजात अध्यात्मिक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे मत सर्वांनी व्यक्त केले. अखेर या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी-चिंचवड शहर संघटनेचे अध्यक्ष विजू शेठ जगताप म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात वारकरी संप्रदायाची परंपरा मोठ्या श्रद्धेने जपली जाते. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा चार दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह हा शहराच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वातावरणाला अधिक बळ देणारा ठरेल. शहरातील सर्व वारकरी, भक्त आणि नागरिकांनी या सप्ताहात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर असले तरी आपली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. अशा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, सकारात्मकता आणि अध्यात्मिक मूल्यांची जपणूक होते. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील वारकरी परंपरा, भक्ती चळवळ आणि सामाजिक एकात्मतेला चालना मिळणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाला महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी-चिंचवड शहर संघटनेचे अध्यक्ष विजू आण्णा जगताप, उपाध्यक्ष तानाजी आण्णा काळभोर, कोषाध्यक्ष विजुभाऊ गायकवाड, नगरसेवक सुरेशभाऊ भोईर, नगरसेविका डॉ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, प्रसिद्धी प्रमुख किशोर पाटील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडिबा मामा भोंडवे, सदस्य कैलास कातळे, सुधीर ढगे पाटील, सतपाल ढोरे, ज्ञानेश्वर भाडळे, ओंकार कातळे तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!