शबनम न्यूज | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त राजलक्ष्मी सोशल फाउंडेशन व नवचेतना संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने “नारी शक्ती – संस्कृतीची ओळख” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी खास प्रदर्शन व विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच पारंपरिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनामध्ये अनेक महिलांनी हस्तकला, घरगुती उत्पादने व पारंपरिक वस्तूंचे स्टॉल्स लावून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रियाताई अण्णाबनसोडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका अर्पणा डोके,आशा सुर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर, मनिषा चिंचवडे, शालिनी गुजर व शिक्षण मंडळाचे मा.सभापती श्रीधर वाल्हेकर उपस्थित होते.
मान्यवरांनी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या स्टॉल्सना भेट देत महिलांच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि अशा कार्यक्रमांमुळे महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मोठी प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.



