शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘एक स्त्रीच दुसर्या स्त्रीला समजून घेऊ शकते. त्यामुळे महिलांनी परस्परांशी स्नेहभाव जोपासावा!’ असे आवाहन ज्येष्ठ नगरसेविका अपर्णा डोके यांनी गांधी पेठ, चिंचवडगाव येथे सोमवार, दिनांक ०९ मार्च २०२६ रोजी केले. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या महिला विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करताना अपर्णा डोके बोलत होत्या. नगरसेविका मनीषा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्त्या पूजा आगज्ञान, मंडळाच्या महिला विभाग अध्यक्षा गीतल गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी योग, वीरपत्नींसाठी कार्य, उद्योग, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आसावरी पाटील, स्मिता सुधीर माने, अनिता बागमार, किरण शिर्के, श्रेया दंडे, दिशा कदम, विमल मरळ, वर्षा सूर्यवंशी, अरुणा जगताप, संगीता घोडके, राजश्री भुजबळ, दीपाली तिकोने, रफिया पानसरे या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.
अपर्णा डोके पुढे म्हणाल्या की, ‘समाजात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या घरापासूनच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करावा!’ मनीषा चिंचवडे यांनी, ‘महिलांनी स्वतःच्या प्रपंचासोबतच समाजासाठी आपल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करावा!’ असे मत व्यक्त केले. दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वैशाली खोले यांनी प्रास्ताविक केले. रेश्मा जमदाडे यांनी मंडळाच्या महिला विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. दिशा कदम यांनी महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले. संगीता घोडके यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. आसावरी पाटील यांनी सामुदायिक ध्यानयोगाचे प्रात्यक्षिक घेतले; तर श्रेया दंडे या युवतीने ऐतिहासिक साहसी क्रीडाप्रकार सादर केले. विमल मरळ यांनी योग प्रात्यक्षिके सादर केलीत. गीतल गोलांडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून सर्व महिला कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या संयोजनात चंद्रकला शेडगे, रत्नमाला बोरकर, शेहनाज मुलाणी, कस्तुरी जमखंडी, सोनल जमदाडे, सुनीता पांढारकर, किरण इंगळे, विजया राजवाडे, संतोषी सायकर, मनीषा जंगम, अश्विनी थोरात, स्वप्ना वझे यांनी परिश्रम घेतले. हेमा सायकर यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी नेवाळे यांनी आभार मानले.



