शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरिक सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी मदत मिळावी या उद्देशाने ‘महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना’ सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर आजार, उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणीत असलेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. यामुळे उपचारासाठी आवश्यक असलेला आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना वेळेवर उपचार घेणे शक्य होणार आहे.
नागरिकांनी योजनेचा लाभ कसा घ्यावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
– रुग्णाचे आधारकार्ड (सत्यप्रत)
– रेशनकार्डाची प्रत
– तहसीलदार कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला
– स्थानिक नगरसेवकांचे शिफारसपत्र
– रुग्णालयाकडून देण्यात आलेले उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (डॉक्टरांच्या सही व शिक्क्यासह)
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती अचूक असणे आवश्यक असून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच आर्थिक सहाय्य मंजूर केले जाईल. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या नावाने धनादेशाद्वारे आर्थिक मदत दिली जाईल.
“शहरातील गरजू नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत आणि आर्थिक अडचणीमुळे कोणालाही वैद्यकीय सेवा नाकारावी लागू नये, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी मदत मिळावी आणि त्यांना दिलासा मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.”
– रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.



