शबनम न्यूज | प्रतिनिधी
एएआयबी (AAIB) चा अहवाल प्रसिद्ध होऊन आठ दिवस उलटूनही VSR कंपनीविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने संबंधित प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांनी CID कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व गुन्हा तातडीने दाखल करण्याची मागणी केली.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मागील भेटीच्या वेळी CID अधिकाऱ्यांनी AAIB चा अहवाल आल्यानंतर VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अहवाल येऊन आठ दिवस झाले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील व्ही. के. सिंग चौकशीसाठी CID कार्यालयात आले असताना त्यांना पोलिसांकडून VIP वागणूक देण्यात आल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर CID कार्यालयात त्यांच्या सुरक्षा रक्षकाला AK-47 शस्त्रासह प्रवेश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी CID अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.
याबाबत पुन्हा एकदा CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. मात्र आजही अधिकाऱ्यांनी सध्या गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत अंतिम अहवाल (फायनल रिपोर्ट) आल्यानंतरच कारवाई केली जाईल, असे नवीन आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात संबंधित व्यक्ती कोणाचे तरी नाव उघड करेल या भीतीमुळे त्याला जाणीवपूर्वक पाठीशी घातले जात आहे का, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात कितीही वेळकाढूपणा झाला किंवा कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला तरी ‘अजित दादा’ यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन आणि पाठपुरावा सुरूच ठेवणार, असा इशाराही देण्यात आला आहे.



