शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर आणि जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयआयटी कानपूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या “टीम तटरक्षक” ने “इनोवेशन इन रेझिलियनट इन्फ्रास्ट्रक्चर” हा प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
देशभरातून ३०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पीसीसीओईआरच्या विजेत्या संघात अभिषेक गिरी, वैशाख आनंद एम, माहेक फातन, सृष्टी सावळी यांचा समावेश होता.
टीम तटरक्षक ने मजबूत तांत्रिक पायाभूत रचना, नाविन्यपूर्ण डिझाईन, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीची क्षमता असलेला प्रकल्प सादर केला. ‘किनारपट्टी वरील पूरपरिस्थिती आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणीय बुद्धिमत्ता आणि संरचनात्मक अभियांत्रिकी तत्त्वांचा समन्वय साधून शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करणे’ हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. प्रकल्पांचे सखोल तांत्रिक परीक्षण, दस्तऐवजीकरण पडताळणी, व्यवहार्यता विश्लेषण, नूतन उपक्रम मूल्यांकन तसेच व्यावसायिक विस्तारक्षमतेचे परीक्षण अशा कठोर निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. .
विजेता संघाला पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल इंजीनियरिंग विभाग प्रमुख डॉ. समीर सावरकर, आरएनडी प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे यांनी मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.



