spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी दिली उत्स्फूर्त दाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी व गाथा फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय महोत्सव २०२६ चा आज शुभारंभ झाला. धुलीवंदनचा सण उत्साहात साजरा होत असतानाही सिनेमाप्रेमींची पाऊले फिल्म फेस्टिव्हलकडे वळली. पहिल्याच दिवशी देश-विदेशातील दर्जेदार लघुपट आणि माहितीपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली. सामाजिक, सांस्कृतिक, मानवी मूल्ये, निसर्ग, ओळख आणि परंपरा यांच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या चित्रपटांनी प्रेक्षकांना अद्वितीय अनुभव दिला. सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला.

पहिल्या दिवशी विशेषरित्या सादर झालेल्या काही उत्कृष्ट चित्रपटांमध्ये केकी, चक्री, इको चेंबर, द वेट वॉल, लॉस्ट साँग्स ऑफ सुंदरी, मलवाझी, अ हाफ ऑफ हाफ-हार्टेड, द मिरॅकल ऑफ लाईफ, व्हेन द बेल रिंग्स, तपस, इलिजिटिमेट, १९४२ – द कलकत्ता केस, अत्तर, दारा, अ डे इन अ लाईफ, द शो मॅन, द सेव्हन्टींथ इयर आणि तोयम या बहुविध विषयांवर आधारित कलाकृतींचाही समावेश होता. प्रत्येक चित्रपटाने आपली वेगळी शैली आणि प्रामाणिक कथनशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली.

यासोबतच प्रदर्शित झालेल्या कलाकृतींमध्ये गणपती तू सर्वोत्तम, बर्नार्ड अँड राशा: अ स्विस–इंडियन स्टोरी, पोळी, मनीथा शुभाव्वम, रेहान स्पेशल, मार्त्या, बादारे, काली, देविचंद्रगुपथम् आणि अ बोहेमियन आर्टिस्ट यांचा समावेश होता. दुपारच्या सत्रात अंतर (डिस्टन्स), सार रूट्स ऑफ हीलिंग, रोजेस आर, द लास्ट युग, अनंत (एंडलेस), वाट, ओवाशेसॉट – लॉस्ट इन पर्स्यूट, अग्निपरीक्षा, बस्तर से बाजार तक आणि द फिनिश लाईन यांनी विविध सामाजिक आणि भावनिक मुद्द्यांवर प्रभावी प्रकाश टाकला. सायंकाळच्या सत्रात प्रदर्शित झालेल्या म्यामबाई – परमिशन टू द गार्डियन्स ऑफ द फॉरेस्ट, कसागी कन्सिना कागदा, थ्री मायनस वन, स्लर, आणि ब्रेक द सायलेन्स या चित्रपटांनी निसर्गसंवर्धन, मानवी संघर्ष, आदिवासी जीवन आणि सामाजिक जबाबदारी यांवरील कथनशैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

‘तपस्’, ‘मलवाझी’ आणि ‘लॉस्ट साँग्स ऑफ सुंदरी’ ने जिंकली प्रेक्षकांची मने

‘तपस्’, ‘मलवाझी’ आणि ‘लॉस्ट साँग्स ऑफ सुंदरी’ या तीन विशेष लघुपटांनी पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवला. ‘तपस्’ कर्करोगाशी झुंज देणाऱ्या एका तरुण मुलाची विज्ञान आणि अध्यात्म यांच्या सहकार्याने घडलेली उपचारयात्रा अत्यंत स्पर्शून जाणाऱ्या पद्धतीने मांडतो; हा संघर्ष, जिद्द आणि आशावादाचा प्रवास आहे. ‘मलवाझी’ केरळमधील लोकश्रद्धा, परंपरा आणि विधींमधून उलगडणाऱ्या मानवी भावविश्वाची सांस्कृतिक खोली प्रभावीपणे दाखवतो, तर ‘लॉस्ट साँग्स ऑफ सुंदरी’ मुंबईच्या शहरीकरणामुळे कोळी समाजाची हरवणारी ओळख, त्यांची समुद्राशी असलेली नाळ आणि सुंदरि या पौराणिक प्रतीकाची कथा संवेदनशीलतेने समोर आणतो. तीनही चित्रपटांनी मानवी अनुभवांचे वेगवेगळे पण समानपणे हृदयस्पर्शी पैलू उलगडत प्रेक्षकांना भावनिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक स्तरांवर समृद्ध करणारा अनुभव दिला.

६०-सेकंदांच्या दोन लघुपटांना प्रेक्षकांची विशेष दाद

महोत्सवात प्रदर्शित झालेल्या दोन ६०-सेकंदांच्या विशेष लघुपटांना प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. ‘अ हाफ ऑफ हाफ-हार्टेड’ मध्ये रिओ द जानेरो शहरातील अव्यवस्थेचे विनोदी, व्यंगात्मक चित्रण दिसते जिथे शहरी जीवनातील साधे घटकही विचित्र आणि अपारंपरिक रूपात उभे राहतात, आणि गोंधळाला शहरात कायमची जागा मिळते. तर ‘व्हेन द बेल रिंग्स’ मध्ये जंगलाच्या सान्निध्यातील एकाकी घरात राहणाऱ्या स्त्रीच्या शांत उपस्थितीतून अंतर्मनातील पोकळी, हरवलेल्या गोष्टींची ओढ आणि स्वीकृतीचा शोध यांची भावस्पर्शी मांडणी अनुभवायला मिळते. दोन भिन्न संकल्पनांचे हे लघुपट, फक्त ६० सेकंदांतही, प्रेक्षकांना खोल विचारात पाडणारे ठरले.

या चित्रपट महोत्सवात तब्बल ४३ देशांमधील ११६ चित्रपटांची निवड करण्यात आली असून महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांद्वारे विज्ञान विरुद्ध अंधश्रद्धा, रूढीपरंपरा, समाजव्यवस्था, निसर्ग व पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञानातील बदल, प्रेम व मानवी भावना, महापूर आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच महापुरुषांच्या जीवनप्रेरणादायी कार्यावर आधारित विविध विषयांचा वेध घेण्यात आला आहे. यासोबतच शिक्षण व ज्ञानप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानता, युवा नेतृत्व विकास, ग्रामीण विकास व शाश्वत प्रगती, सामाजिक समता व मानवाधिकार, आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जनजागृती, बालहक्क, कला व लोकसंस्कृतीचे जतन, उद्योजकता व नवकल्पना, जागतिक शांतता, दिव्यांग सक्षमीकरण, क्रीडा प्रेरणा, हवामान बदलाबाबत जनजागृती तसेच कुटुंब व्यवस्थेतील मूल्ये अशा विविध समाजाभिमुख आणि सकारात्मक विषयांचाही समावेश करण्यात आला आहे.

३ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे या सर्व चित्रपटांची मेजवानी नागरिकांसाठी पूर्णपणे ‘विनामूल्य’ ठेवण्यात आले आहे. शहरातील कलाप्रेमींना जागतिक दर्जाचे चित्रपट, माहितीपट आणि लघुपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. नागरिकांनी या महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, विविध देशांतील आणि विविध भाषांतील कलाकृतींचा आनंद लुटावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!