spot_img
spot_img
spot_img
spot_img

समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण

शबनम न्यूज | पुणे

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील बंधारे तसेच पाझर तलावांवर अतिक्रमणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पर्यावरण विभागाकडे या जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली.

महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या ३२ गावांतील बंधारे, पाझर तलाव या नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमण होत आहे. या नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन केले जावे, असे पत्र जिल्हा परिषदेने महापालिकेला दिले होते. याची दखल महापालिकेने घेतली आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सामाविष्ट गावांतील बंधारे आणि पाझर तलावांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी या विभागांकडे देण्यात आली.

महापालिकेत समावेश झालेल्या गावांना आवश्यक सोयी पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने त्या देण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी पाषाण, मॉडेल कॉलनी आणि कात्रज येथील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या तलावांच्या कामाच्या खर्चाला पालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार तीनपैकी दोन तलावांची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, महापालिकेत समाविष्ट गावांतील २५ ते ३० पाझर तलाव तसेच बंधारेदेखील सुरक्षित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!