शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या स्थायी समिती सभापतीपदी प्रभाग क्रमांक 23 मधील भाजपचे नगरसेवक अभिषेक बारणे यांची निवड निश्चित मानली जात असून शहराच्या राजकीय वर्तुळात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत स्थायी समिती सदस्य म्हणून विविध पक्षांच्या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्या सदस्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता स्थायी समिती सभापतीपदी अभिषेक बारणे यांचीच वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अभिषेक बारणे हे थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. 2017 मध्ये त्यांनी प्रथमच भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. त्यानंतर 2026 च्या निवडणुकीतही त्यांनी भरघोस मताधिक्याने विजय संपादन करत सलग दुसऱ्यांदा नगरसेवकपद मिळवले. प्रभागातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क यामुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. पक्षनिष्ठा, संघटनात्मक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता भाजपकडून त्यांना स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपच्या वतीने स्थायी समिती सदस्य म्हणून शालिनीताई गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, शीतल वर्णेकर, कृष्णा सुरकुले, अर्चना कारंडे, मधुरा शिंदे आणि बाबासाहेब त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता आस्वानि , संतोष कोकणे, संदीप वाघेरे आणि विकास साने यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे यांची निवड झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे स्थायी समिती सभापतीपदासाठी कोणताही अन्य नगरसेवक इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत अभिषेक बारणे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात शहरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


