शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील पी.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, नगरसेविका अनिता काटे तसेच नगरसेविका कुंदाताई भिसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला सादरीकरणे सादर केली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळ तसेच मर्दानी खेळांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर नृत्य आणि विविध खेळांचेही उत्कृष्ट प्रदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि सुशासनाच्या आदर्शांची माहिती देत त्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला.
यावेळी शत्रुघ्न काटे म्हणाले, “शिवजयंतीसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत होते. आजच्या पिढीने शिवरायांच्या आदर्शांचा स्वीकार करून शिस्त, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती कर्तव्यभावना जोपासावी. अशा शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होते.”
या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. जगन्नाथ आप्पा काटे, उद्योजक श्री. सोमनाथशेठ काटे, श्री. संजयशेठ भिसे, श्री. संदेश काटे पाटील, श्री. रोहन काटे तसेच शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 225969