spot_img
spot_img
spot_img

भक्ती-शक्ती उद्यान येथील कार्यक्रमात १४ शाहिरांनी शाहिरीतून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण….गातो शिवरायांचे गुणगान जी..जी..जी..” अशी डफावर थाप पडते आणि शाहिरांच्या कंठातून बाहेर पडतात,शिवरायांचे गुणगान गाणारे स्फूर्तीदायक शब्द….अशा उत्साहपूर्ण वातावरणात नामवंत शाहिरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरीच्या ओजस्वी स्वरांतून मानवंदना अर्पण केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिरीतून मानवंदना’ या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्दांतून उभा राहिला स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास, तालांतून झंकारली शौर्याची अखंड परंपरा आणि स्वरांतून प्रकट झाला स्वाभिमानाचा जाज्वल्य अभिमान एकप्रकारे नागरिकांनी तो अनुभवला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याला आणि व्यापक विचारधारेला अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात काल सायंकाळी निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे “छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिरीतून मानवंदना” हा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील शाहिरी या माध्यमातून शिवजन्मोत्सवापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचा गौरवशाली इतिहास प्रभावी शब्दकळा, दमदार वाणी आणि प्रेरणादायी सादरीकरणातून उलगडण्यात आला. शाहीर प्रकाश ढवळे, शाहीर अशोक कामथे, शाहीर बाळासाहेब मालुसकर,शाहीर चैतन्य काजुळकर, शाहीर जालिंदर शिंदे,शाहीर लीना देशपांडे, शाहीर वनिता मोहिते, शाहीर कांचन जोशी, शाहीर प्रचिती विष्णूरकर, शाहीर स्मिता बांदिवडेकर, शाहीर चित्रा कुलकर्णी,शाहीर उज्ज्वला जाधव, शाहीर राजरत्न पांडगळे आणि शाहीर घनश्याम कुदळे यांनी आपल्या ओजस्वी शाहिरी सादरीकरणातून उपस्थितांना अक्षरशः शिवकालीन वातावरणात नेले. त्यांच्या शब्दांतून स्वराज्याची पताका, पराक्रमाची गाथा आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली.

या प्रेरणादायी कार्यक्रमाला महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर, निलेश शिंदे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, संतोष सातपुते, आबासाहेब ढवळे, सतीश काळे, नागनाथ म्हस्के, ज्ञानेश्वर लोभे, सचिन आल्हाट, संदीप निकम, कुणाल कांबळे, सचिन बोऱ्हाडे, संदीप बोराडे, सागर लक्ष्करे, स्वप्निल शिंदे तसेच दुर्गा संजीवनी सामाजिक संस्थेचे बापूसाहेब कुतवळ, निलेश धावडे, राज साबळे, नामदेव धिंडले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी शिवचरित्रातील आदर्श मूल्यांचा जागर पुन्हा एकदा अनुभवला. शाहिरीच्या सशक्त शब्दांमधून स्वराज्य, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत या कार्यक्रमाने शहरातील नागरिकांच्या मनामनांत शिवविचारांची नवचैतन्यपूर्ण ज्योत प्रज्वलित केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!