spot_img
spot_img
spot_img

स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला; कार्यकाळ अडीच वर्षांचा

एका टर्ममध्ये १४ जणांना संधी देण्याचा निर्णय – मंत्री चंद्रकांत पाटील

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राज्यातील महापालिकांमधील स्वीकृत नगरसेवक पदाबाबत भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यापुढे या पदाचा कार्यकाळ पाच वर्षांऐवजी अडीच वर्षांचा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या नव्या फॉर्म्युल्यानुसार एका कार्यकाळात सातऐवजी तब्बल १४ कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्याचा भाजपचा मानस आहे. त्यामुळे पक्षातील अधिकाधिक कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

पराभूत उमेदवारांना संधी नाही

पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापालिका निवडणुकीत ज्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि जे पराभूत झाले आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाणार नाही. या निर्णयामुळे काही पराभूत उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली असली, तरी त्यांनी पुन्हा जनतेमध्ये जाऊन कार्य करावे आणि निवडणुकीत विजयी व्हावे, अशी अपेक्षा पक्षाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणुकीत ज्यांना तिकीट नाकारण्यात आले किंवा जे तिकीट स्पर्धेत नव्हते, अशा निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, यामुळे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पराभूत उमेदवारांसाठी पर्यायी संधी

ज्यांना भाजपकडून निवडणुकीत तिकीट देण्यात आले होते, त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याऐवजी त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करून महामंडळे, मंडळे किंवा अन्य संस्थांमध्ये संधी देण्याचा विचार पक्षाकडून केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभर लागू होणार निर्णय

हा निर्णय केवळ एखाद्या महापालिकेसाठी मर्यादित नसून, राज्यातील सर्व महापालिकांसाठी समानरित्या लागू राहणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी जाहीर केले.

या नव्या फॉर्म्युल्यामुळे भाजपमध्ये संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!