शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्कॉर्पिओ कारच्या व्यवहारात मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८, ३१६, ३३६(२), ३३८, ३३६(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीकडील सुमारे १२ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ (MH XX XXXX) ही गाडी दोन ते तीन दिवस वापरण्यासाठी देण्याच्या बहाण्याने आरोपींनी विश्वास संपादन केला. मात्र, फिर्यादीच्या संमतीशिवाय गाडीची डुप्लिकेट आर.सी. बुक, आधारकार्ड, पॅनकार्ड व नोटरी कागदपत्रे तयार करून गाडी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात
१) ऋषिकेश विठ्ठल महापुरे (२४)
२) अविनाश नवनाथ बोऱ्हाडे (३२)
३) अमर दामोदर चरवड (३७)
४) विनोद शंकर पवार (४०)
५) भालचंद्र सुखदेव थोरात (३८)
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी भालचंद्र थोरात याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
आरोपी क्रमांक १ ने बनावट नोटरी दस्तऐवजांच्या आधारे गाडी विक्री केली, तर आरोपी क्रमांक ४ ने कोणतीही खात्री न करता फिर्यादीची गाडी परस्पर विकत घेतल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित गाडी पुढे सज्जन मधुकर ढवळे (रा. माढा, जि. सोलापूर) यांना वापरण्यास देऊन फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास चिंचवड पोलीस ठाणे करत असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


