१४ शाळांमधील सुमारे २३५६ विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा व सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा व सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी राबविण्यात येणारा “एक दिवस शाळेसाठी” हा उपक्रम प्रभावीपणे सुरू आहे.
मा. पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड यांच्या निर्देशानुसार फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी हा उपक्रम राबविण्यात येत असून, याअंतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण १४ टीममार्फत शहरातील १४ शाळांना भेट देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, अपघात प्रतिबंध, अमली पदार्थ व व्यसनाधीनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
आज दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी या उपक्रमाचा २६ वा टप्पा राबविण्यात आला. यावेळी निवडलेल्या १४ शाळांमधील सुमारे २३५६ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना पीपीटीद्वारे विविध महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यात आली.
“एक दिवस शाळेसाठी” या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २६ टप्प्यांत ४३२ शाळांमधील तब्बल १,०२,९९९ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक व सुजाण व्यक्तिमत्त्व घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा उपक्रम मा. श्री. विनयकुमार चोबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, मा. श्री. शशिकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. सागर आवाड, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी श्री. विवेक पाटील, पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) तसेच वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थी व शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या यशस्वी उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.


