spot_img
spot_img
spot_img

मोरे वस्ती परिसरात लो व्होल्टेजचा गंभीर प्रश्न; एलटी केबल तात्काळ बदलण्याची यश साने यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील मोरे वस्ती, प्रभाग क्रमांक १ येथील अनेक सोसायट्यांमध्ये अपुऱ्या क्षमतेच्या व निकृष्ट साहित्यातील एलटी केबल टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या केबलमुळे परिसरात लो व्होल्टेज, वारंवार वीज खंडित होणे, तसेच घरगुती विद्युत उपकरणे जळण्याच्या घटना सातत्याने घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तसेच लहान व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक यश दत्तात्रय काका साने यांनी भोसरी येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन सादर करून, मोरे वस्ती परिसरातील विविध सोसायट्यांमधील एलटी केबल तात्काळ व पूर्णपणे बदलण्याची ठोस मागणी केली आहे.

यावेळी यश साने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून चालणार नाही. लवकरात लवकर दर्जेदार व पुरेशा क्षमतेच्या एलटी केबल टाकण्यात याव्यात आणि या परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात याव्यात.”

तसेच, जर या मागण्यांकडे तातडीने दखल घेतली गेली नाही, तर नाईलाजाने नागरिकांसह आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही यावेळी यश साने यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी करत नागरिकांनीही प्रशासनाने गंभीरतेने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!