शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल व धोकादायक गुन्हेगारांवर महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी या दोन्ही गुन्हेगारांना एक वर्षाच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसाठी अपहरण, गंभीर दुखापत, दरोड्याची तयारी तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे निर्देश मा. पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पोलीस स्टेशन स्तरावर अभिलेख तपासणी करून व्यापक प्रतिबंधक कारवाईचा आराखडा राबविण्यात आला.
या कारवाईत पहिला गुन्हेगार रजीत लक्ष्मण येरकर (वय १९, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) हा चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, पळवून नेऊन बलात्कार तसेच बेकायदेशीर घातक हत्यार बाळगणे असे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दुसरा गुन्हेगार रामदास मारुती साळुंके (वय ३७, रा. आंबेठाण, ता. खेड) हा उत्तर महाळुंगे एमआयडीसी, चाकण व परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, खंडणीसाठी अपहरण, तडीपार आदेशाचा भंग तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जानेवारी २०२६ मध्ये एमपीडीएअंतर्गत एकूण दोन कारवाया करण्यात आल्या असून, सन २०२५ मध्ये अशा ३५ कारवाया करण्यात आल्या होत्या. या कठोर कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असून भविष्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महाबरकर, अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण व उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


