शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ नंतरची पहिली विशेष सभा आज संपन्न झाली. या सभेत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची अधिकृतपणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. नव्या जबाबदारीचा स्वीकार करताना भाऊसाहेब भोईर यांनी महापालिकेत नागरिकांचा आवाज बुलंद करण्याची ग्वाही दिली.
या विशेष सभेच्या सुरुवातीलाच अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीनंतर भाऊसाहेब भोईर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारला. अजितदादांचे विचार, त्यांची कार्यपद्धती आणि लोकहिताची भूमिका डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल भाऊसाहेब भोईर यांनी उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनील तटकरे, पार्थदादा पवार, पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच सहकारी नगरसेवकांचे मनापासून आभार मानले.
“येणाऱ्या कार्यकाळात या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे प्रश्न, प्रलंबित समस्या आणि सर्वांगीण विकासासाठी महापालिकेत प्रभावीपणे आवाज उठवेन. सामान्य जनतेचा आवाज महापालिकेत सदैव बुलंद राहील,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
भाऊसाहेब भोईर यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्ष अधिक आक्रमक आणि संघटित भूमिका घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


