शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी प्रभाग क्रमांक ३२ मधून निवडून आलेले नगरसेवक प्रशांत शितोळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीस अनुसरून संबंधित भाजप गटाची नोंदणी विभागीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत एकूण ८४ नगरसेवक निवडून आणले आहेत. या सर्व नगरसेवकांची बैठक ३० जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत “पिंपरी-चिंचवड महापालिका भारतीय जनता पार्टी गट” स्थापन करण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
याच बैठकीत भाजप गटनेतेपदासाठी प्रशांत शितोळे यांच्या नावावर सर्व नगरसेवकांनी एकमताने शिक्कामोर्तब केले. आगामी महापालिकेच्या कारभारात पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे, विकासकामांना गती देणे आणि संघटनात्मक समन्वय राखणे ही जबाबदारी प्रशांत शितोळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
भाजपने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविल्यामुळे प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामे अधिक वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास पक्षाच्या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.


