राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदावर आज शनिवारी सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे. या निवडीनंतर सायंकाळी लोकभावनावर त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज दुपारी दोन वाजता विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षातील आमदारांकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार असून, त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या राज्यसभा जागेसाठी पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत असून, या घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


