एमआयडीसीतील उद्योगांच्या समस्या वीज विभागासमोर मांडल्या
शबनम न्यूज | प्रतिनिधी
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि भोसरी महावितरण कार्यालय यांची संयुक्त बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत भोसरी एमआयडीसी परिसरातील लघु व मध्यम उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत लघु उद्योगांसाठी वीजबिल भरण्यासाठी हप्ता योजना पुन्हा सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मध्य प्रदेशात राबविण्यात येणाऱ्या “समाधान योजना”प्रमाणे वीजबिलावरील विलंब शुल्क व दंडात मोठ्या प्रमाणावर सवलत देणारी, कायमस्वरूपी आणि उद्योगपूरक योजना महाराष्ट्रातही लागू करावी, अशी ठाम भूमिका उद्योजकांनी मांडली. सध्या राज्यात लागू असलेली “अभय (Amnesty) योजना” मर्यादित कालावधीसाठी असून तिच्या अटी कठोर असल्याने उद्योगांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
यासोबतच महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र सबसिडी योजना लागू करावी, तसेच परिसरनिहाय उद्योग तक्रार निवारण केंद्रांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करावी, जेणेकरून उद्योजकांना त्यांच्या समस्या तातडीने मांडता व सोडवता येतील, अशी मागणीही करण्यात आली.
बैठकीदरम्यान नवीन फिडर परिसरातील ओव्हरहेड केबलचे प्रश्न, मनुष्यबळाची कमतरता, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी यांसह विविध मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय मागील बैठकीत मांडलेल्या समस्यांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला.
या बैठकीस फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय भोर, उपाध्यक्ष श्री. वैभव जगताप, श्री. शिवाजीराव पाटील यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते. महावितरणतर्फे मुख्य कार्यकारी अभियंता तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उद्योजकांशी समन्वय साधून परिसरातील समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असे आश्वासन महावितरण प्रशासनाने यावेळी दिले.


