शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक अखेर संपन्न झाली असून निकालांमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा शहरातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. मात्र या निकालांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो प्रभाग क्रमांक १६ मधील शिवसेना (शिंदे गट) चा अनपेक्षित आणि निर्णायक विजय.
प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचे वर्चस्व राहिले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने तीन नवीन उमेदवारांना संधी देत राजकीय गणित पूर्णपणे बदलून टाकले. शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश तरस यांनी पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवत बलाढ्य मानले जाणारे मोरेश्वर भोंडवे यांचा पराभव केला.
विकासाचे स्पष्ट आराखडे, प्रभावी डावपेच आणि मतदारांशी थेट संवाद या त्रिसूत्रीमुळे निलेश तरस यांना यश मिळाले.
याच प्रभागात शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेंद्र तरस यांच्या पत्नी ऐश्वर्या तरस यांनीही राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे यांचा पराभव करत विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षे राष्ट्रवादीकडून सामाजिक उपक्रम राबविणारे बापू दिनकर कातळे यांच्या पत्नी सौ. रेश्मा बापू कातळे यांना ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी भाजपच्या माजी नगरसेविका संगीता भोंडवे यांचा दारुण पराभव केला. यामुळे प्रभाग १६ मध्ये शिवसेनेने संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले.
शिवसेना शिंदे गटाची शहरात दमदार कामगिरी
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे एकूण सहा उमेदवार विजयी झाले असून ही कामगिरी पक्षाच्या अपेक्षेपेक्षा निश्चितच भरीव ठरली आहे.
प्रभाग क्रमांक २४ मधून खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे चिरंजीव विश्वजीत बारणे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत भाजपचे सिद्धेश्वर बारणे यांचा एकतर्फी पराभव केला. याच प्रभागातून खासदारांचे पुतणे निलेश बारणे यांनीही अपक्ष उमेदवार गणेश गुजर यांचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली.
प्रभाग १३ मध्ये दिग्गजांमध्ये थेट लढत
सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरली ती प्रभाग क्रमांक १३ मधील. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे विरुद्ध मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांच्यात झालेल्या या चुरशीच्या लढतीत सुलभा उबाळे यांनी बाजी मारली.
सुलभा उबाळे यांना ९,१०४ मते मिळाली, तर अश्विनी चिखले यांना ७,३८३ मते मिळाली.
चार वर्षांच्या विलंबानंतरचा निकाल आणि शिंदे गटाची ताकद
तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या या महापालिका निवडणुकीत शिवसेना दोन गटांत विभागलेली असताना पिंपरी-चिंचवड शहरात शिंदे गट किती प्रभाव टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निकालांनी स्पष्ट केले की, शिवसेना शिंदे गटाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत सहा नगरसेवक महापालिका सभागृहात पाठवले आहेत.
या यशामागे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची संघटनात्मक ताकद आणि नेतृत्व निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


