spot_img
spot_img
spot_img

तुषार हिंगे यांना महापौर पदाची संधी द्यावी; पिंपरीकरांची जोरदार मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. २२ जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर शहराचा पुढील महापौर कोण, याबाबत राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशा परिस्थितीत भाजपचे अनुभवी व कार्यक्षम नगरसेवक, माजी उपमहापौर तुषार हिंगे यांना महापौर पदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून होताना दिसत आहे.

मागील भाजपच्या कार्यकाळात उपमहापौर म्हणून काम करताना तुषार हिंगे यांनी प्रशासनावर पकड, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी घेतलेली ठाम भूमिका तसेच सभागृह चालविण्याची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. २०१७ साली पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी विकासकामे, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भातील प्रश्न प्रभावीपणे मांडले होते.

पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपच्या आधीच्या कार्यकाळात चिंचवड व भोसरी या दोन्ही मतदारसंघांना महापौर पदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, पिंपरी विधानसभा मतदारसंघाला आजपर्यंत भाजपच्या कार्यकाळात महापौर पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे यावेळी राजकीय समतोल राखण्यासाठी व पिंपरीच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी या मतदारसंघाला महापौर पद देण्यात यावे, अशी भावना नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तुषार हिंगे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, त्यांनी कायम पक्षसंघटन मजबूत ठेवण्याबरोबरच तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केल्याचे चित्र दिसून येते. त्यांच्या शांत, संयमी व अभ्यासू नेतृत्वशैलीमुळे ते सर्व पक्षांच्या नगरसेवकांमध्येही स्वीकारार्ह चेहरा मानले जातात. त्यामुळे महापौर पदासाठी ते योग्य व सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आगामी महापौर निवडीबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला असून, सामाजिक समतोल, राजकीय समीकरणे आणि अनुभव या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळत आहेत. अशातच पिंपरी विधानसभा मतदारसंघातून “यावेळी संधी पिंपरीला आणि महापौर तुषार हिंगे” अशी जोरदार मागणी पुढे येत असून, भाजप नेतृत्व या मागणीला कितपत प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!