शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज मुंबईतील मंत्रालयात पार पडली. या सोडतीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी महापौरपद ‘सर्वसाधारण’ (खुला गट) प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. हे आरक्षण पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी, म्हणजेच २०२६ ते २०२८ या कालावधीत लागू राहणार आहे.
राजकीय अंकगणितामुळे महापौरपदावर भाजपची दावेदारी जवळपास निश्चित मानली जात असून, आता महापौरपद कोणत्या नगरसेवकाकडे जाणार, याबाबत शहराच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुढील प्रक्रिया काय?
आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील टप्प्यात विभागीय आयुक्तांमार्फत महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जातील. साधारणपणे येत्या पंधरा दिवसांत विशेष सभा बोलावून नव्या महापौरांची औपचारिक निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एससी प्रवर्गाला अद्याप प्रतीक्षा
आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) तसेच अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील नगरसेवकांना संधी मिळाली आहे. मात्र, अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण अद्याप लागू झालेले नाही. त्यामुळे भविष्यातील आरक्षण सोडतीकडे एससी प्रवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
नव्या नेतृत्वाकडे शहराचे लक्ष
महापौरपदासाठी ‘सर्वसाधारण ’ आरक्षण जाहीर झाल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय होणार हे निश्चित मानले जात आहे. आगामी अडीच वर्षांचा महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, आणि त्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला कोणती दिशा मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


