शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत संदीप बाळकृष्ण वाघेरे, निकिता अर्जुन कदम आणि प्रियांका कुदले यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी डब्बू आसवानी यांनी पर्यावरणपूरक आणि साधेपणाचा संदेश देत सायकलवरून निवडणूक कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करत एक आदर्श निर्माण केला. कोणताही दिखावा न करता, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही कृती नागरिकांच्या विशेष चर्चेचा विषय ठरली असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी परिसरातील नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आत्मविश्वास पाहता, डब्बू आसवानी यांच्या मागील कार्यकाळातील कामगिरीवर जनतेचा ठाम विश्वास असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, युवकांसाठी विविध उपक्रम तसेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या ठोस आणि परिणामकारक कामांमुळे त्यांनी केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर जनतेच्या विश्वासू सहकाऱ्याची ओळख निर्माण केली आहे.
लोककल्याणकारी योजना, सतत जनतेमध्ये असलेली उपस्थिती आणि अडचणीच्या काळात तत्पर मदत हीच त्यांची कार्यशैली राहिली आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून विश्वास जपणारे नेतृत्व म्हणून डब्बू आसवानी यांच्याकडे नागरिक पाहतात.
साधेपणा, पारदर्शकता आणि विकासाचा ठाम अजेंडा घेऊन पुढे जाणारे हे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झाले असून, यावेळी त्यांच्या विजयाबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरण दिसून येत आहे.


