spot_img
spot_img
spot_img
spot_img

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षणविश्वावर शोककळा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि बिहार, त्रिपुरा तसेच पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे बुधवारी वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात “शिक्षणसम्राट” म्हणून ओळख असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांची उभारणी करून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप येथे त्यांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या मातीत वाढलेले हे रांगडे व्यक्तिमत्त्व सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणप्रेमासाठी कायम स्मरणात राहील.

राजकीय कारकिर्दीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेल्या डॉ. पाटील यांनी १९५७ ते १९६२ या काळात कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून महापौर, आमदार आणि पुढे बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे राज्यपाल असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरला आहे.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेता आणि समाजसेवक हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याचा ठसा भारतीय शिक्षणविश्वावर कायम राहणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!