नगरसेविका ऐश्वर्या तरस यांचे महापौरांना निवेदन; विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सर्व विद्यार्थिनींसाठी ‘गुड टच – बॅड टच’ जनजागृती व प्रशिक्षण तसेच कराटे (स्वसंरक्षण) प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या काळात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना चिंताजनकरीत्या वाढत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी लहान वयापासूनच विद्यार्थिनींमध्ये योग्य-अयोग्य स्पर्शाची जाणीव निर्माण करणे आणि स्वसंरक्षणाची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.
यासाठी महापालिका आणि खासगी शाळांमध्ये महिला पोलीस अधिकारी, बालसंरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समुपदेशक यांच्या माध्यमातून ‘गुड टच – बॅड टच’ विषयावर नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक शाळेत विद्यार्थिनींसाठी नियमित कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षण सुरू करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित विभागांना द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी महापौरांकडे केली आहे.



