९.२९ लाखांचे सोन्याचे दागिने घेतले; दिघी पोलिसांत गुन्हा
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : पैसे ट्रान्सफर केल्याचा बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून सराफाचा विश्वास संपादन करत ६ लाख २९ हजार ७८० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दिघी येथे उघडकीस आला आहे. आरोपीने ५९.८७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी निलेश बाळकृष्ण जाधव (वय ४६, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक आनंद हातकामकर (वय ३६, रा. पोलादपूर, जि. रायगड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तीन लाख रुपये आगाऊ दिले आणि त्यांच्याकडून ९ लाख २९ हजार ७८० रुपये किमतीचे ५९.८७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बनवून घेतले. उर्वरित ६ लाख २९ हजार ७८० रुपये NEFTद्वारे पाठवल्याचा स्क्रीनशॉट आरोपीने फिर्यादीला दाखवला.
मात्र, प्रत्यक्षात पैसे खात्यात जमा झाले नसतानाही व्यवहार पूर्ण झाल्याचे भासवून आरोपी सोन्याचे दागिने घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १८ मार्च रोजी सावंतनगर, दिघी येथील कृष्णा सिल्वर वर्कशॉपमध्ये घडला. याबाबत १ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.



