महामार्गावर बंद पडलेला हायवा धोकादायक स्थितीत उभा; ट्रकची पाठीमागून जोरदार धडक, महिला जखमी
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : मुंबई-सातारा महामार्गावर वाकड ब्रिजजवळ मध्यरात्री बंद पडलेल्या हायवा ट्रकला पाठीमागून दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तर एक महिला जखमी झाली. शनिवारी (दि. १) रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
या दुर्घटनेत निवृत्ती जावजी पवार आणि अशोक लेलँड ट्रकचालक पंढरीनाथ बांदेकर (रा. सांगली) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. कल्पना कवडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी संजय रामचंद्र कवडे (वय ४२, रा. भिवंडी, जि. ठाणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हायवा ट्रक (एमएच २० ईएल ९६००) वरील अज्ञात चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कवडे हे पत्नी आणि सासऱ्यांसह कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ गावी जात होते. ते प्रवास करत असलेल्या ट्रकने वाकड ब्रिजजवळ महामार्गाच्या लेनमध्ये बंद अवस्थेत उभ्या असलेल्या हायवाला धडक दिली.
हायवा बंद पडल्यानंतर चालकाने वाहन धोकादायक पद्धतीने रस्त्यावर उभे ठेवले. तसेच वाहनामागे आवश्यक अंतरावर रिफ्लेक्टिव्ह वॉर्निंग ट्रँगल, पार्किंग लाईट अथवा अन्य सुरक्षेचे इशारे न लावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रकचालकाला हायवा लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अपघातात ट्रकचेही मोठे नुकसान झाले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे करीत आहेत.



