पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने चाकण परिसरात कारवाई करत गावठी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले ३०० लिटर रसायन जप्त केले. या प्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १४ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील बहुळ गाव हद्दीतील पठारे वस्ती येथे छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान महिला आरोपीच्या ताब्यातील दोन निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये सुमारे ३०० लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन आढळून आले.
जप्त करण्यात आलेल्या रसायनाची किंमत सुमारे १५ हजार रुपये असून, त्यामध्ये मानवी आरोग्यास अपायकारक व जीवितास धोका निर्माण करणारे घटक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित महिला कोणताही परवाना नसताना हे रसायन बाळगून त्याचा बेकायदेशीर विक्रीसाठी वापर करत असल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट यांच्या फिर्यादीवरून चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


